चंदननगर पोलिसांकडून बेघर, बेरोजगारांना जीवनाश्यक साहित्य
वडगावशेरी – चंदननगर पोलीस गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्यांवर काठी उगारणारे हात आता गरिबांना अन्नदान करीत असल्याने खाकीतही माणुसकी असल्याचे चित्र दिसत आहे.
वडगावशेरी येथे 70 बेघर तसेच बेरोजगार कुटुंबांना पोलिसांना आढळून आली. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून अशी कुटुंबं शोधून काढली. खराडी आणि वडगावशेरी भागात अनेक ठिकाणी पोलिसांकडून बेघरांना मदत केली जात आहे. खराडी भागातील 250 लोकांची यादी आता पोलिसांना प्राप्त झाली आहे. अनेक गरजू लोक मदतीची अपेक्षा घेऊन पोलिसांकडे येत आहेत. यामुळे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक कार्यकर्तेही मदतीसाठी पुढे येत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदशनखाली अनेक कुटुंबांना पोलीस कर्मचारी मदत पोहचवीत आहेत. पाच किलो तांदूळ, गहू, दोन किलो साखर, तेल, डाळ, साबण आदी वास्तूची मदत केली जात आहे. यावेळी पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश पासलकर, एएसआय माणिक शिंदे, पीएसआय सचिन जाधव, हरी कदम, दीपक चव्हाण, राहुल सोनकांबळे, अनिल कोडीलकर आदी पोलीस कर्मचारी याकामी सहकार्य करीत आहेत.