पुणे जिल्हा | स्पर्श मेडिकलचा मानवतावादी सेवाभाव : वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

तळेगाव ढमढेरे,(वार्ताहर)- आषाढी वारीतील वारकऱ्यांची स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. सामाजिक भावनेतून स्पर्शच्या पदाधिकाऱ्यांनी सेवाभाव जपला आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हार्दे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत कापरे, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. योगेश झुरंगे, डॉ. सोमनाथ गव्हाणे, डॉ. बापू दरेकर, डॉ. जयश्री पाटील, डॉ. सुमन वाव्हाळ, डॉ. सारीका रूके, डॉ. नितीन शिंगाडे, डॉ. अमोल सोनटक्के, डॉ. शरद जाधव, डॉ. ऋतूजा भोर या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता.
श्री सद्गुरू पांडुरंग महाराज दिंडी सोहळ्याचे उत्सव प्रमुख महेश भुजबळ, अध्यक्ष प्रदीप पाठक, दीपक लांडे, जालिंदर भुजबळ, दुर्गेश भुजबळ, सुरेश नरके, राजेंद्र खुरपे, पोपट भुजबळ यांच्या वतीने डॉक्टरांनी केलेल्या सेवेबद्दल ऋण व्यक्त केले.
वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने परिस्पर्श
वारी सोहळ्यात दररोज सकाळी पहाटे चालणे सुरू होते. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी हे अंतर पंधरा ते वीस किलोमीटर प्रवास आहे. रोजचा प्रवास ऊन, वारा, पाऊस यांच्याशी झगडत पायी चालू असतो.
अनेक शारीरिक वेदना, प्रवासातील दगदग, पायी चालून चालून फोड, जखमा, पायांना सूज, सर्दी, खोकला, ताप येतो. अशावेळी कोणीतरी दूत धावून यावा. त्याप्रमाणे स्पर्श मेडिकलचे पदाधिकारी धावून आले.





