Human Washing Machine: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जपान ने आता एक भन्नाट शोध लावला आहे. ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’ नावाची ही अत्याधुनिक मशीन माणसाला हात न लावता आंघोळ घालू शकते. फक्त १५ मिनिटांत शरीर स्वच्छ करून रिलॅक्सही करते. त्यामुळे भविष्यातील लाइफस्टाइल किती सोपी आणि आरामदायक होऊ शकते, याची झलक या मशीनमुळे दिसते. ही खास मशीन जपानमधील ‘साइन्स’ या टेक कंपनीने तयार केली आहे. या मशीनची पहिली झलक वर्ल्ड एक्सपो २०२५ मध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ही मशीन सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Human Washing Machine या मशीनची रचना एका मोठ्या कॅप्सूलसारखी आहे. वापरकर्ता या कॅप्सूलमध्ये आरामात झोपतो आणि त्यानंतर मशीन आपलं काम सुरू करते. यात अल्ट्रा-फाइन मायक्रोबबल्स आणि हलक्या गरम वाफेचा वापर करून शरीर स्वच्छ केलं जातं. हे बबल्स त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन आतल्या घाणीलाही साफ करतात. त्यामुळे शरीर रगडण्याची अजिबात गरज भासत नाही. ही मशीन फक्त शरीर स्वच्छ करत नाही, तर मानसिक आरामही देते. आंघोळ करताना कॅप्सूलमध्ये शांत संगीत आणि व्हिडिओ दाखवले जातात. त्यामुळे वापरकर्त्याला एक स्पा सारखा अनुभव मिळतो. याशिवाय, मशीनमध्ये बसवलेले सेन्सर्स हार्ट रेटसारख्या गोष्टी ट्रॅक करतात आणि शरीर किती रिलॅक्स आहे, याचं विश्लेषण करतात. Human Washing Machine Japan’s first-ever AI-powered ‘human washing machine’ ही सुविधा सध्या होक्काइडोमधील एका हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. १५ मिनिटांच्या एका सेशनसाठी सुमारे १२ हजार येन म्हणजेच अंदाजे ७ हजार रुपये खर्च येतो. एका वेळी तीन लोक ही सेवा घेऊ शकतात. मात्र, यासाठी आधी बुकिंग करावं लागतं आणि मशीनमध्ये स्विमसूट घालणं आवश्यक आहे. या मशीनची किंमत सुमारे ६० मिलियन येन म्हणजेच जवळपास ३.५ कोटी रुपये आहे. त्यामुळे सध्या ती सर्वांसाठी उपलब्ध नाही. जपानमधील काही हॉटेल्स आणि मोठ्या स्टोअर्सनीच ही मशीन खरेदी केली आहे. कंपनी सध्या फक्त ५० मशीन तयार करण्याचा विचार करत आहे. Human Washing Machine या प्रकल्पामागील उद्देश लोकांना अधिक आरामदायक आणि हेल्दी जीवनशैली देण्याचा आहे. कंपनीचे चेअरमन यासुआकी आओयामा यांच्या मते, भविष्यात प्रत्येक व्यक्तीला अशा सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. एकूणच, ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’ ही तंत्रज्ञानातील मोठी क्रांती मानली जात आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या मशीनमुळे आपलं दैनंदिन जीवन अधिक सोपं आणि आरामदायक होण्याची शक्यता आहे.