– स्वप्निल काळे आज १० डिसेंबर, मानवी हक्क दिन.. या दिवशी मोठमोठी भाषणे आणि कार्यक्रमांमधून मानवी हक्कांची आठवण करून दिली जाते. परंतु प्रश्न असा पडतो की, हा दिवस संपल्यानंतर या मानवी हक्कांचे काय होते? १९४८ मध्ये स्वीकारलेला मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा आज ७७ वर्षांनंतरही केवळ इतिहासाच्या पानांमध्येच अडकून पडला आहे का? मानवी हक्क म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय घोषणापत्र नसून प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानपूर्वक जीवनाचा कणा आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, आर्थिक स्तर किंवा राजकीय ओळख न पाहता, प्रत्येकाला समान वागणूक मिळावी, ही या मानवी हक्कांची मूलभूत संकल्पना आहे. मात्र उघड्या डोळ्यांनी वास्तव पाहिले तर सामाजिक विषमता, अन्याय आणि शोषण आजही दैनंदिन सवय बनली आहे. स्त्रिया अजूनही सुरक्षित नाहीत. निर्भयतेच्या घोषणा दिल्या जातात, पण घरात, रस्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान अबाधित आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसरीकडे लहान मुलांना शिक्षणाऐवजी कामाच्या ओझ्याखाली ढकलले जाते. बालहक्क कायदे कागदावर आहेत, प्रत्यक्षात मात्र बालकामगार सर्वत्र दिसतो. आज मानवी हक्कांचे उल्लंघन फक्त बंदुकीने किंवा काठीने होत नाही, तर ते डिजिटल पद्धतीनेही होत आहेत. सोशल मिडियावर ट्रोलिंग, धमक्या, गोपनीयतेवर घाला आणि खोटी माहिती, या नव्या शस्त्रांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. मत मांडले की देशद्रोही ठरवण्याची संस्कृती यातून निर्माण झाली आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या युगात माणूस आपले वैयक्तीक आयुष्य, स्वाभिमान आणि मानसिक आरोग्य विसरत चालला आहे. माणुसकीपेक्षा पैशाचे महत्त्व अधिक वाढत आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळामुळे रोज कर्मचाऱ्यांकडून आत्महत्या होतात. अशी अनेक उदाहरणेही आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण या मानसिक छळावर कोणीही आवाज उचलत नाही. यावर कोणी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही मानसिक छळाला सामोरे जावे लागते, त्यामुळे ही वृत्ती अधिक बळावते. मानवी हक्क दिन म्हणजे औपचारिक कार्यक्रम नव्हे, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण कोणाच्या हक्कांकडे डोळेझाक करत नाही ना, आपल्या मौनामुळे कुठे अन्याय तर बळावत नाही ना, हा सवाल आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे जितके होते, तितकेच ते गप्प बसणाऱ्यांमुळेही होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मानवी हक्क जपायचे असतील, तर ते केवळ साजरे करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे उभे राहावेच लागेल, प्रश्न विचारावेच लागतील आणि गरज पडल्यास सत्तेला अस्वस्थ करावेच लागेल. कारण अन्याय पाहून शांत बसणारा समाज कधीच बदल घडवू शकत नाही. प्रश्न विचारणारे नागरिक, सजग विद्यार्थी, निर्भीड पत्रकार आणि संवेदनशील संस्था, यांच्यामुळेच मानवी हक्क जिवंत राहू शकतात.