Huma Qureshi: बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हुमा कुरेशीला मिळाला, ‘फेस ऑफ एशिया’ पुरस्कार

Huma Qureshi: बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिला प्रतिष्ठित बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘फेस ऑफ एशिया’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे हुमा प्रचंड आनंदित असून तिने तो सर्व तरुण मुलींना समर्पित केला आहे. तिच्या ‘बयान’ या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंगही या फेस्टिव्हलमध्ये झाली.
“अभिनेत्री होणं शक्य नाही असं म्हटलं जात होतं”
पुरस्कार स्वीकारताना हुमा थोडी भावूक झाली. तिने आपल्या संघर्षाची आठवण करून दिली. हुमा म्हणाली,
“बुसान फिल्म फेस्टिव्हलचा हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत खास आहे.
माझे वडील दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये जन्मले, आई गावात जन्मली. मला अनेकदा सांगितलं जायचं की अभिनेत्री होणं माझ्या हातातलं नाही. त्यामुळे आज मी इथे उभी आहे, हेच माझ्यासाठी मोठं यश आहे. हा पुरस्कार मी त्या सर्व तरुण मुलींना अर्पण करते, ज्या स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्याची हिम्मत ठेवतात.”
View this post on Instagram
वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत
हुमा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा कथित मित्र रचित सिंह याच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती. मात्र, हुमा हिने सोशल मीडियावरील एका पोस्टमधून या चर्चांना पूर्णविराम दिला. तिने लिहिलं, “आपल्या कामाशी काम ठेवा.”
रचित सिंह हे अभिनय प्रशिक्षक असून आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि विक्की कौशल यांसारख्या कलाकारांना त्यांनी ट्रेनिंग दिलं आहे. ‘कर्मा कॉलिंग’ या मालिकेतून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. हुमा आणि रचित अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र असून त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. अगदी टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बयान’च्या स्क्रीनिंगदरम्यानही रचित उपस्थित होता.





