वाघोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टला करोडो मराठा बांधव मुंबईवर धडकणार असून, आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही, असा ठाम निर्धार मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान वाघोली येथे रविवारी (दि. २०) आयोजित सभेत त्यांनी मराठा बांधव आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. वाघोलीतील सीजन २४ येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत मराठा समाजाच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली.जरांगे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून शांततामय मार्गाने मागणी करूनही सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आता मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटणार असून, विजय आणि आरक्षण घेऊनच परतणार आहे. चर्चेचा मार्ग आता बंद झाला असून, लोकशाही मार्गाने शांततामय आंदोलन केले जाईल. सरकारने मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला. अंतरवाली, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळे फाटा, जुन्नरच्या शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेज घाटामार्फत कल्याण-चेंबूर मार्गे मुंबईला जाण्याचा मार्ग त्यांनी जाहीर केला.