मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर शुक्रवार, दि.९ जानेवारीपासून पुढील विकासकामांसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. “गर्दीमुळे प्रशासनावरही भाविकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी ताण येत आहे. मंदिर बंद होण्यापूर्वी दर्शन घ्यावे,” या भावनेतून राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकरात दाखल होत आहेत. परिणामी संपूर्ण परिसरात गर्दीचे चित्र दिसून येत आहे. भाविकांची संख्या वाढल्याने सर्व पार्किंग स्थळे पूर्णपणे भरली असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहिल्याचे चित्र आहे. पार्किंग स्थळांपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एसटी बससेवेची मोठी कमतरता जाणवत असून भाविकांना पायी प्रवास करावा लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचे हाल होत आहेत. भीमाशंकर–घोडेगाव, मंचर तसेच इतर मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने भाविकांचा वेळ व संयम दोन्ही संपत चालले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करत असले तरी अचानक वाढलेल्या गर्दीपुढे प्रशासनही काहीसे हातबल झाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि दर्शनासाठी लागणारा वेळ यामुळे भाविकांसह पोलीस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन, अतिरिक्त बससेवा व वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मंदिर बंद होणार असल्याची बातमी ऐकून खास दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येऊ लागले आहे. मात्र, प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि बससेवेअभावी खूप त्रास होत आहे. प्रशासनाने सर्व खबरदारी घेऊन भाविकांना उत्तम सेवा द्यावी. – रमेश येवले, उद्योजक, गंगापूर. भीमाशंकरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. भाविकांना दर्शनाची ओढ मोठी आहे, पण पार्किंग व वाहतुकीचा गोंधळ पाहून अडचणी वाढल्या. प्रशासनाने अधिक चांगली व्यवस्था करावी. – तुलसी सचिन भोर,माजी जिल्हा परिषद सदस्या चास.