सातारा : दिवसभर अखंडपणे चाललेला ‘ॐ दत्त चिले ॐ’ चा गजर, विविध ठिकाणच्या जंगम वृंदांकडून महारुद्राभिषेकावेळी झालेला मंत्रोच्चार, महाआरतीने झालेली पारायण सोहळ्याची सांगता, आकर्षक फुलांच्या सजावटीत, वाद्यांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेली रथयात्रा आणि सायंकाळी सद्गुरु हिंगमिरे देवांच्या सानिध्यात, टिपेल्या पोचलेल्या दत्तनामाच्या उद्घोषात साजरा झालेला दत्त जन्मकाळ उपस्थितांना दत्त नामाच्या शाळेत तल्लिन करणारा ठरला. मोर्वे (ता. खंडाळा) येथील दत्त मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित दत्त जयंती सोहळ्यास यंदाही नेहमीप्रमाणेच आबालवृद्धांनी अलोट गर्दी करत, दत्तभक्तीचे दर्शन घडवले. सद्गुरु ज्ञानोबा हिंगमिरे यांच्या कृपाशिवार्दाने अध्यात्मिक शक्तीकेंद्र म्हणून नावारुपास आलेल्या येथील मल्लिकार्जुन दत्त मंदिरात यंदा बालचमूंसाठीही विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मोर्वे येथे साजरे होणारे वर्षभरातील उत्सव, अमावस्या आणि पौर्णिमा काळाची संपूर्ण माहिती देणाऱ्या संस्थानच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवर्षावात दत्त जन्मसोहळा साजरा झाला. सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दत्त जन्माची पाळणागीते सादर झआली. हजारो भाविकांनी येथील दत्तमूर्तीचे लोभस रुप ‘याचि देहा, याचि डोळा’ साठवून घेतले. दत्तजयंतीनिमित्ताने संपूर्ण मंदिर गाभाऱ्यात केलेली फुलांची आकर्षक सजावट, मंदिरावरील विद्युत रोषणाई आणि येणाऱ्या सर्व भाविकांसाठी श्री दत्त मूर्ती आणि सद्गुरु हिंगमिरे देव यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, कोल्हापूर, जयसिंगपूरसह मुंबई येथील श्री मरीआई भजनी मंडळांची भजनसेवाही यावेळी सादर झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.