तामिळनाडुत ‘या’ पक्षाच्या नेत्यांवर EDचे छापे

नवी दिल्ली/चेन्नई – अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि त्यांचे खासदार पुत्र गौतम सिगामनी यांच्या ठिकाणांवर मनी लॉंड्रिंग प्रकरणात छापे टाकले आहेत. आज बंगळुरात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होत आहे त्या पार्श्वभूमीवर विरोधकांना धमकावण्यासाठी अशा धाडी टाकल्या जात आहेत असा आरोप विरोधी पक्षांच्या गोटातून केला जात आहे.
ईडीच्या माध्यमातून धमकावून विरोधी पक्षांना फोडण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. द्रमुकनेही ही राजकीय सूडबुद्धीचीच कारवाई आहे असे म्हटले आहे. राजधानी चेन्नई आणि विल्लुपुरममध्ये पिता-पुत्रांच्या घरांवर ईडीने आज छापे टाकले. मंत्री पोनमुडी हे विल्लुपुरम जिल्ह्यातील तिरुक्कोयलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा सिगामणी कल्लाकुरिची मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत आहे.
पोनमुडी हे राज्याचे खाण मंत्री असताना (2007 आणि 2011 दरम्यान) त्यांच्यावर खाण परवाना अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप होता ज्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 28 कोटी रुपयांचे नुकसान झाले असा आरोप आहे. त्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून आपला मुलगा आणि कुटुंबियांसाठी खाण परवाने मिळवल्याचा आरोप आहे.
या कारवाईच्या संबंधात बोलताना द्रमुकचे प्रवक्ते ए सरवणन यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष बंगळुरू मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील बैठकीसाठी सहभागी होण्यासाठी जात असतानाच ही कारवाई केली गेली आहे. त्यात केवळ धमकावण्याचाच उद्देश आहे. आमच्या विरोधी आघाडीत सहभागी होण्याच्या निर्धाराचीच चाचणी घेण्याचा हा प्रकार आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
गुटखा घोटाळ्यासारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर एआयएडीएमकेच्या नेत्यांवर केंद्रीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. द्रमुकचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावरही ईडीने अशीच कारवाई करून त्यांना अटक केली आहे.





