प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरच्या आत परीक्षांचे अर्ज भरावे लागणार आहे. राज्य मंडळाची बारावी आणि दहावीची शालांत परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज मंडळाकडे सादर करण्यात येत आहे. बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आता १० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत राहणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.