Tejashwi Ghosalkar post : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायती समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानंतर महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. अशातच मंगळवारी मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. यामुळे काहींच्या वाट्याला हसू तर काहींच्या वाट्याला आसू असे आले आहे. आरक्षण सोडतनंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत आली आहे. आरक्षण सोडतनंतर जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे, तर अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना फटका बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या वॉर्डमध्ये ओबीसी आरक्षण लागल्याने त्यांना निवडणूक लढवताना येणार नाही. यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे, त्यांनी इतर प्रभागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर काही महिन्यांपूर्वी नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी शिंदे सेनेत न जाता ठाकरेंची साथ देण्याचे ठरवले. त्यानुसार त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहिल्या. मुंबई महापालिकेसाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होत्या. मात्र, आरक्षण सोडतीमध्ये त्यांचा वार्ड ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांची निवडणुकीची संधी हुकली असून त्यांचा हिरमोड झाला आहे. View this post on Instagram A post shared by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasveeghosalkar) खरंतर तेजस्वी घोसळकर या शिंदेसेनेत जातील अशी चर्चा सुरू असतानाच त्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षाकडून त्यांना महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोठी जबाबदारी सोपवली. मात्र, आता त्यांचा वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील वॉर्ड आरक्षणाची लॉटरी जाहीर झाली आहे. माझ्या वॉर्ड क्रमांक १ मधील जागा ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे, मी ही निवडणूक लढवू शकणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. हा निर्णय खरोखरच निराशाजनक आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही म्हणून नाही, तर मी माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील लोकांची प्रतिनिधी म्हणून सेवा करणे सुरू ठेवू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटते, अशी खंत त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली आहे. पुढे त्या म्हणाल्या, मात्र, हा निर्णय माझ्या सार्वजनिक सेवेच्या प्रवासात अडथळा आणणार नाही. अभिषेकच्या अकाली निधनापासून, मला घोसाळकर कुटुंबाकडूनच नव्हे तर माझ्या वॉर्ड, दहिसर आणि बोरिवलीतील प्रत्येक रहिवाशांकडून अपार प्रेम, विश्वास आणि पाठिंबा मिळाला आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. हेही वाचा : मोठी बातमी! गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात केले दाखल