जामखेड, (प्रतिनिधी) – भाजप लोकसभेचे उमेदवार सुजय विखे, आमदार प्रा.राम शिंदे आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पक्षांतर्गत मतभेद संपुष्टात आले असले तरी, महायुतीतील घटकपक्ष आणि काही स्थानिक नेत्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आ. राम शिंदे, खा. सुजय विखे यांच्यातील वाद मिटले असले तरी घटक पक्षातील कार्यकर्ते व नेते अद्याप नाराज असल्याचे चित्र मतदारसंघात कायम आहे. हा वाद वेळीच मिटविला नाही तर त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडून जामखेड तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेवक महेश निमोणकर यांची आजच वर्णी लागली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटाचे तालुकाध्यक्ष कैलास माने यांचेही मतदारसंघात काही प्रमाणात अस्तित्व आहे, मात्र त्यांची भूमिका आजपर्यंत स्पष्ट झालेली नाही. तेही नाराज असल्याचे समजते. जामखेड तालुक्यातील मातब्बर स्थानिक नेते प्रा. सचिन गायवळ यांना मानणारा मोठा गट जामखेड तालक्यात सक्रिय आहे. मध्यंतरीच्या काळात झालेली मार्केट कमिटी निवडणूक आणि महिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला सहकार्य करत महत्वाची भूमिका पार पाडली. खरेदी-विक्री संघात भाजपा उमेदवाराचा निसटता पराभव झाला असला तरी जामखेड मार्केट कमिटी निवडणुकीत मात्र त्यांच्या सहकार्याने भाजपाला विजय मिळवता आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीही निवडणुकीत जामखेड तालुक्यातील विखे गट स्थानिक भाजपा उमेदवारांच्या विरोधात काम करत असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत प्रा.सचिन गायवळ आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. नेत्यांचे अंतर्गत मतभेद आणि मनभेद जरी मिटले असले तरी उमेदवार सुजय विखे पाटील यांना महायुतीचे घटक पक्ष आणि स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनचं पुढची रणनिती तयार करावी लागणार आहे.