नवी दिल्ली -ज्या व्यक्तीने अत्याचार केले त्यालाच जर अटक होत नसेल तर त्याच्या विरोधात उभे राहिलेल्या अल्पवयीन मुलीसह अन्य कुस्तीपटू व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कशी मिळणार असा खडा सवाल कुस्तीपटू बजरंग पुनियाने केला आहे.
आरोप केलेली मुलगीही अल्पवयीन नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पुनियाने संताप व्यक्त केला आहे. ही अल्पवयीन महिला कुस्तीपटू खरेच अल्पवयीन आहे का नाही ते तिचे कुटुंबीय किंवा वैद्यकीय तज्ञच सांगू शकतील, असेही बजरंग म्हणाला. खरेतर या मुलीबरोबर अन्य सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याची कुठे वाच्यताच होताना दिसत नाही.
उलट आम्हालाच प्रश्न विचारले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर येत्या 15 जूनला पोलीस चौकशीचा अहवाल बाहेर येणार आहे, त्यात आम्हाला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वासही बजरंगने व्यक्त केला आहे.
आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही किंवा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतीही तडजोड केलेली नाही. आम्ही आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मांडल्या आहेत व त्यांनीही आमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशी खात्री दिली आहे. त्यामुळे सध्यातरी वाट पाहण्याव्यतरिक्त आम्ही काही करू शकत नाही. मात्र, 15 जूनलाही आमच्या पदरी निराशाच पडली तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसावेच लागेल, असेही त्याने म्हटले आहे.
केवळ कुस्तीच नव्हे तर आता आम्हाला संपूर्ण देशातील क्रीडाक्षेत्रातूनही पाठींबा मिळत आहे. त्यामुळे खरेतर सरकारने तातडीने हालचाल करून लक्ष घातले पाहीजे. दोषी कोणीही असो किंवा त्याने कोणताही दोष केलेला असो त्याला माफ करणे चूक ठरेल. आमच्यावर झालेला अन्याय तर दूर झालाच पाहिजे; परंतु येत्या काळातही कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी आता केंद्रीय क्रीडामंत्रालय तसेच महासंघावर निवडणून येणाऱ्या नव्या सदस्यांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही बजरंगने केली.
निवडणूक येत्या 4 जुलै रोजी होणार
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने जम्मू-कश्मीरचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची भारतीय कुस्तीगिर महासंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. महासंघाची निवडणूक येत्या 4 जुलै रोजी होणार असल्याचेही संघटनेने जाहीर केले आहे.