प्रभात वृत्तसेवा रावेत – आकुर्डी परिसरातील खंडोबा चौकात बसविण्यात आलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन ही हवेतील धूलिकण नियंत्रित करणारी महत्त्वाची यंत्रणा अनेक आठवड्यांपासून बंद आहे. परिसरात वेगाने सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे या यंत्रणेच्या दुरुस्तीस विलंब झाल्याचे समोर येत असून त्याचा थेट परिणाम स्थानिक हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. गत काही महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून नागरिकांना दैनंदिन श्वसन समस्या, डोळ्यांची जळजळ, घशात कोरडेपणा आणि धुळीचे प्रमाण अधिक जाणवत आहे.महापालिकेने शहरातील धूलिकणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात एअर प्युरिफिकेशन सिस्टिम, मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन मशीन आणि ड्राय मिस्ट फाउंटन बसविण्याचा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो. ड्राय मिस्ट फाउंटन हे विशेष ब्लोअरद्वारे हवेत सूक्ष्म पाण्याचे तुषार सोडून धूलिकण खाली आणण्याचे काम करते. मात्र खंडोबा चौकातील यंत्रणा बंद असल्याने नागरिकांनी तक्रार व्यक्त केली आहे की, महापालिकेने दिलेली सुविधा प्रत्यक्षात वापरात नसल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली आहे. धुळीमुळे सकाळच्या आणि सायंकालीन वेळेत हवा धुसर होत असल्याचे चित्र नागरिक अनुभवत आहेत. शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा व सीओपीडी रुग्ण या घटनेमुळे सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या वेगाने हवेत पुन्हा धुळीचे ढग उठतात आणि फाउंटन बंद असल्याने त्यावर नियंत्रण नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. आरोग्य तज्ज्ञांचा इशारा हवेत वाढलेल्या PM2.5 आणि PM10 कणांमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. हे सूक्ष्म धूलिकण शरीरात खोलवर प्रवेश करून फुप्फुसांवर प्रतिकूल परिणाम करतात. दिर्घकालीन दमा, एलर्जी आणि फुप्फुसांचे विकार वाढण्यास असे प्रदूषण कारणीभूत ठरत असल्याची नोंद करण्यात येत आहे. आधीपासूनच श्वसनाच्या तक्रारी असलेल्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. “मेट्रो कामामुळे ड्राय मिस्ट आणि एअर प्युरिफिकेशन यंत्रणा तात्पुरती बंद आहेत. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी त्या पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फॉग कॅनन वाहने नियमित फवारणी करत आहेत तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात येत आहेत.” – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पिंपरी–चिंचवड महापालिका “शहरातील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. औद्योगिकीकरण, झाडांची तोड, मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि कचरा जाळण्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. महापालिका आणि पर्यावरण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने बसविलेल्या यंत्रणांचा प्रत्यक्ष फायदा मिळत नाही.” – पराग ठोंबरे स्थानिक रहिवासी व पर्यावरणप्रेमी