अभिनेता सागर कारंडेची फसवणूक कशी झाली? काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मुंबई – मराठी हास्यविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे याच्यासोबत ६१.८३ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, सागर यांनी “तो मी नव्हेच” अशी प्रतिक्रिया देत प्रकरण फेटाळले आहे. सायबर गुन्हेगारांनी इन्स्टाग्राम पोस्ट लाइकच्या बहाण्याने त्यांना फसवल्याचा आरोप आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणावर पुन्हा प्रकाश पडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सागर यांना एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. एका महिलेने त्यांना प्रत्येक इन्स्टाग्राम लाइकसाठी १५० रुपये मिळतील, असे सांगितले. सागर यांनी पोस्ट लाइक केल्यानंतर त्यांच्या खात्यात ११,००० रुपयांचे १० व्यवहार जमा झाले, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. पुढे टेलिग्राम ग्रुपद्वारे त्यांना मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले गेले.
त्यांनी २७ लाख रुपये गुंतवले आणि नंतर १९ लाख रुपये करासह भरले. एकूण ६१.८३ लाख रुपये गमावल्यानंतर पैसे मिळाले नाहीत. ४ मार्चला शंका आल्यावर त्यांनी ५ मार्चला सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार केली आणि ३१ मार्चला कांदिवली सायबर ठाण्यात गुन्हा नोंदवला.
या प्रकरणात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, काही पथके परराज्यात चौकशी करत आहेत. सागर यांनी मात्र माध्यमांशी बोलताना, “हे खोटे आहे. सागर कारंडे नावाचे अनेकजण आहेत. मी तक्रार केलीच नाही,” असे सांगितले.
सागर कारंडे हे ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतून घराघरात पोहोचले. त्यांच्या या कथित फसवणुकीमुळे सायबर गुन्ह्यांबाबत सतर्कतेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद लिंक आणि कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

