जीवन कसे जगावे?

गावे कसे किंवा जगणे म्हणजे काय? खरंच आपण ह्यावर विचार करतो का? जो जन्माला येतो तो जगतो अगदी मरेपर्यंत जगतो, नव्हे नव्हे त्याला जगावच लागतं. पण ते कसं? कुठे? केव्हा? किती काळ? आनंदात की दुःखात? समाधानात, नातेवाईकात, एकटं, आवडतं होऊन, की नावडतं होऊन, लाडकं की दोडकं, सुप्रसिद्ध? की कुप्रसिद्धी मिळवून? श्रीमंतीत की गरिबीत? आवडीने की नाईलाजाने रडतकुढत? स्वाभिमानाने की लाचारीने? स्वावलंबी की परावलंबी कितीतरी पद्धतीने माणसे जगत असतात… “क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा’, असे म्हणणारा एखादा प्रेमवीर तर “जळो जीणे लाजिरवाणे’, असे म्हणणारा गरीब लाचार! कोणी श्रीमंतीच्या गुर्मीत तर गरिबीत अपराधी भावनेने… आपण कल्पना करू शकणार नाही इतक्या विविध पद्धतीने आणि वेगवेगळ्या अवस्थेत लोक जगात जगत असतात !
सुख, संपत्ती, पैसा, धन, वैभव ही जगण्यासाठी आवश्यक साधने आहेत का? हो नक्कीच आहेत; पण त्यात समाधान सर्वात महत्त्वाचं नाही का? जगणं यशस्वी करण्यासाठी देखील अनेक गोष्टी लागतात जसे जिद्द, चिकाटी, आवड, पैसा, वक्तशीरपणा, श्रद्धा आणि हे सर्व असूनही सर्वात महत्त्वाचं दीर्घायुष्य तेच नसेल तर? हे काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागतेच; पण हेही खरे की काही माणसे आपल्या छोट्याशा आयुष्यातही खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगून जगाला हुरहुर लावून जातात. संदेश, शिकवण देऊन जातात. उदा. संत ज्ञानेश्वर. आपण एखाद्या झोपडीत आनंदी समाधानी वातावरण पाहतो. चटणी भाकरी खाऊन देखील हसून खेळून, मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती एकाच कुटुंबात आढळतात; पण एखाद्या बंगल्यात कटकटीचे असमाधानाचे वातावरण दिसते. अगदी पंच पक्वान्ने खाऊनही सतत कटकटीचे कलहपूर्ण वातावरण असते. म्हणजेच एखादा सायकल घेऊनही वाहन सौख्य पुरेपूर उपभोगतो तर एखाद्याला मोटरकार दारात असेल तरीही विमानाची अपेक्षा असते! अर्धा पेला भरलेला म्हणणारी माणसे किती आहेत? रिकामा म्हणणारीच जास्त. आपण वारीच्या वेळी पंढरपूरला पायी निघालेली माणसे पाहतो. त्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूरच्या विठोबाला भेटण्याची आस, ओढ, अधीरता आणि समाधानाचं हास्य विलसत असतं निर्व्याज, निर्मळ निरपेक्ष!
जगणं स्वाभिमानाचं असावं पण लाचारीचं नसावं! अंगी कर्तव्यपूर्ती असावी पण गर्व नसावा. न अपेक्षा न उपेक्षा असे राहिले तर जगणे सोपे होऊन जाते. माझी आई 93 वर्षांची आहे. तिच्या नखात रोग नाही. वडिलांना जाऊन 28 वर्षे झाली. त्यांच्या पेन्शनमध्ये सुख समाधानाने स्वतंत्र राहते. “जियो और जिने दो’ हे तिचे ब्रीदवाक्य आहे. स्वाभिमानाने आणि बाणेदारपणे राहते. चेहऱ्यावर हास्य आणि सदैव कुणालाही मदतीला तयार असते. वेळोवेळी मुलांनाच मदत करते. पण कुणाकडून पै ची अपेक्षा नाही. तिच्याकडे आजीबाईचा बटवा आहे, दुसऱ्यांच्या दुःखांवर फुंकर घालण्याचे कसब आहे, कोलमडलेल्याला उभारी देण्याची ताकद आहे. भक्ती, श्रद्धा, माया, ममता, प्रेम, सारं सारं आहे. एक परिपूर्ण स्त्री माझी माय परिपूर्ण समाधानी जीवन जगण्याचं प्रतीक! माणसाने चढ आला म्हणून खचू नये आणि उतार आला म्हणून हसू नये. मुळातच मनुष्य जीवन हे अत्यंत दुर्मीळ आणि भाग्याची गोष्ट आहे. प्रसन्न मनाने आनंदाने जगा!
अनुराधा पवार





