तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहचवायच्या कशा?

शिक्षकांना प्रश्न : नियोजन कोलमडण्याची चिन्हे
पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या. दहावीच्या दोन पेपर वगळता सर्व विषयाच्या उत्तरपत्रिका घरी बसून तपासण्यास मुभा देण्यात आली. मात्र, लॉकडाउनमुळे या उत्तरपत्रिका शाळेत कशा पोहचवायच्या अथवा त्या विभागाकडे कशा सादर करायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
करोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या दि. 23 मार्च रोजी होणारी सामाजिक शास्त्र व भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलला. संचारबंदीमुळे शिक्षकांनाही शाळेत येऊन पेपर तपासणी शक्य नाही. त्यामुळे घरी बसून उत्तरपत्रिका तपासणी करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, मंडळाने शिक्षकांना घरी बसून उत्तरपत्रिका तपासणी करण्याची परवानगी दिली.
दरम्यान, लॉकडाउनमुळे सर्वच शिक्षकांना घरी बसून उत्तरपत्रिका तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. गोपनियतेची बाब लक्षात घेता काही शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणी कठीण होऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे, ते शिक्षक घरी बसून उत्तरपत्रिका तपासणी करीत आहेत. मात्र ज्यांना शाळेत येऊन पेपर तपासणी करावयाची आहे, त्यांना मात्र संचारबंदीमुळे त्याठिकाणी जाणेही कठीण झाले आहेत. त्यामुळे पेपर तपासणीस दिरंगाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
संबंधित विषयाची परीक्षा होताच, दुसऱ्या दिवसांपासून त्या विषयाची उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होत आहे. शिक्षकांनी काही विषयाची उत्तरपत्रिका तपासली आहे. मात्र, या उत्तरपत्रिका मुख्य नियामकाकडे सादर करावे लागतात. त्यांनतर नियामक संबंधित विभागीय मंडळाकडे उत्तरपत्रिका सादर करतात. ही प्रक्रिया आता लॉकडाउनमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन कोलमडणार असल्याची चिन्हे आहेत.





