Contraceptive Pills: गर्भनिरोधक गोळ्या खरंच किती सुरक्षित? शरीरात नेमकं काय घडतं, कोणत्या महिलांनी घ्यावी विशेष काळजी
Contraceptive Pills गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये कृत्रिम हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स महिलांच्या नैसर्गिक हार्मोनल प्रक्रियेत बदल घडवून गर्भधारणा होण्यापासून संरक्षण करतात.

Contraceptive Pills: अनिच्छित गर्भधारणा टाळण्यासाठी जगभरातील लाखो महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. योग्य पद्धतीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास या गोळ्या सुरक्षित आणि प्रभावी मानल्या जातात. मात्र, त्यांचा वारंवार किंवा स्वतःच्या मनाने वापर केल्यास काही आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या गोळ्या शरीरात कशा काम करतात आणि त्यांचे संभाव्य दुष्परिणाम कोणते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये कृत्रिम हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स महिलांच्या नैसर्गिक हार्मोनल प्रक्रियेत बदल घडवून गर्भधारणा होण्यापासून संरक्षण करतात. या गोळ्या अंडोत्सर्जन (ओव्ह्युलेशन) थांबवतात, गर्भाशयाच्या मुखातील श्लेष्मा (सर्व्हायकल म्युकस) अधिक घट्ट करतात आणि गर्भाशयाचे आतील अस्तर पातळ करतात. त्यामुळे शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. जरी फलन झाले तरी फलित अंडे गर्भाशयात रुजण्याची शक्यता कमी होते. योग्य प्रकारे घेतल्यास या गोळ्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरू शकतात.
अनेक महिलांमध्ये असा गैरसमज असतो की गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास कायमस्वरूपी वंध्यत्व येते. मात्र, उपलब्ध संशोधनानुसार हा समज चुकीचा आहे. बहुतेक महिलांमध्ये गोळ्या बंद केल्यानंतर एक ते तीन महिन्यांत प्रजनन क्षमता पूर्ववत होते. काही काळ हार्मोन्समध्ये बदल जाणवू शकतात, परंतु त्यामुळे कायमस्वरूपी अपत्यप्राप्तीची क्षमता नष्ट होत नाही. (Contraceptive Pills)
तथापि, इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्यांचा वारंवार वापर टाळावा. अशा गोळ्या नियमितपणे घेतल्यास मासिक पाळीचे चक्र बिघडू शकते. तसेच, काही महिलांमध्ये पीसीओएससारख्या आधीपासून असलेल्या समस्या या गोळ्यांमुळे काही काळ लपून राहू शकतात. त्यामुळे गोळ्या बंद केल्यानंतर अशा समस्या समोर येऊ शकतात. (Contraceptive Pills)

Contraceptive Pills
अलीकडील काही संशोधनांमध्ये हार्मोनल गर्भनिरोधक औषधे आणि मेंदूमधील मेनिन्जिओमा नावाच्या ट्यूमरचा संभाव्य संबंधही दिसून आला आहे. हा ट्यूमर बहुतांश वेळा कॅन्सरजन्य नसतो, मात्र त्याचे वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. विशेषतः काही प्रकारच्या प्रोजेस्टोजेन हार्मोन असलेल्या औषधांबाबत अधिक संशोधन सुरू आहे. त्यामुळे अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे योग्य नाही. (Contraceptive Pills)
या गोळ्यांमुळे काही महिलांमध्ये रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट) तयार होण्याचा धोका वाढू शकतो. याला वेनस थ्रोम्बोएम्बोलिझम असे म्हणतात. गोळ्यांमधील इस्ट्रोजेनमुळे रक्त लवकर गोठण्याची शक्यता वाढते. हा धोका सर्व महिलांमध्ये सारखा नसला तरी धूम्रपान करणाऱ्या, लठ्ठपणा असलेल्या किंवा आधीपासून रक्तवाहिन्यांचे आजार असलेल्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी. (Contraceptive Pills)
याशिवाय, इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधक गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास काही महिलांचा रक्तदाब वाढू शकतो. आधीपासून उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
काही संशोधनांमध्ये या गोळ्यांचा पित्ताशयातील खडे (गॉलब्लॅडर स्टोन) होण्याशीही संबंध आढळून आला आहे. इस्ट्रोजेनमुळे पित्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे पित्ताशयात खडे तयार होण्याची शक्यता वाढते.
एकंदरीत, गर्भनिरोधक गोळ्या योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. मात्र, स्वतःहून वारंवार किंवा दीर्घकाळ वापर करणे टाळावे. कोणतीही गर्भनिरोधक पद्धत निवडण्यापूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.





