नवी दिल्ली – एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातून 5,115 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली. गडकरी यांनी सांगितले की, या कालावधीत सर्वात जास्त टोल कलेक्शन उत्तर प्रदेशात झाले असून या राज्यात 7,060 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन झाले आहे. राजस्थान राज्यात या कालावधीत 5,967 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. हे टोल कलेक्शन अपेक्षेप्रमाणे असल्याचेही गडकरी म्हणाले.वाहन चालकाना कमीत कमी अडथळा होईल अशा पद्धतीने टोल कलेक्शन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वाहकांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने टोल कलेक्शन बर्याच ठिकाणी करण्यात येत असून ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. काही रस्त्यावरून वारंवार प्रवास करणार्यांसाठी वार्षिक पासची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यावर सध्या काम चालू आहे. काही रस्ते सरकार तयार करीत आहे. तर काही रस्ते खासगी क्षेत्राची मदत घेऊन तयार करण्यात येत आहेत. 2014-15 मध्ये 34,805 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक या क्षेत्रात झाली होती. 2023-24 मध्ये 34,805 कोटी रुपयांची खागी गुंतवणूक या क्षेत्रात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.