पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर किती रुपये खर्च झाले? सरकारने थेट आकडेवारीच दिली

PM Modi’s trips cost | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाची आकडेवारी मागितली होती. खरगे यांच्या मागणीनंतर आता सरकारकडून मोदींच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी याबाबतची आकडेवारी दिली.
परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी पंतप्रधान मोदींच्या वर्ष 2022 ते 2024 दरम्यानच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती दिली. लिखित उत्तरात मार्गेरिटा यांनी माहिती दिली की, जून 2023 मध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर 22,89,68,509 रुपये खर्च झाले. तर सप्टेंबर 2024 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यावर 15,33,76,348 रुपये खर्च आला.
मे 2022 मध्ये मोदींनी जर्मनीला भेट दिली होती. तर डिसेंबर 2024 मध्ये ते कुवैतच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात त्यांनी 38 पेक्षा अधिक परदेश दौरे केले. मे 2023 मध्ये पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यासाठी 17,19,33,356 रुपये आणि मे 2022 मध्ये नेपाळ दौऱ्यासाठी 80,01,483 कोटी रुपये खर्च झाले.
परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा आकडा देखील मांडला. त्यांनी माहिती दिली की, 2011 मध्ये अमेरिका दौऱ्यावर 10 कोटी 74 लाख 27 हजार 363 रुपये खर्च झाले. 2013 मध्ये रशिया दौऱ्याचा खर्च 9 कोटी 95 लाख 76 हजार 890 रुपये होता. तर 2011 मध्ये फ्रान्सच्या दौऱ्यावर 8 कोटी 33 लाख 49 हजार 463 रुपये आणि जर्मनीच्या दौऱ्यावर 6 कोटी 2 लाख 23 हजार 848 रुपये खर्च झाले.





