Anangsha Biswas : ‘एका रात्रीचे किती पैसे घेतेस?’; ‘त्या’ भूमिकेमुळे मोठा त्रास, धक्कादायक अनुभव शेअर करत अभिनेत्री म्हणाली…
Anangsha Biswas : याच मुलाखतीत अनंगशाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचच्या अनुभवावरही भाष्य केले. एका वरिष्ठ कास्टिंग डायरेक्टरला तिची अभिनयक्षमता आवडली होती.

Anangsha Biswas : लोकप्रिय वेबसीरिज ‘मिर्झापूर’मध्ये जरीनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनंगशा बिस्वासला या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. जरीनाची बोल्ड व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र, पडद्यावर साकारलेल्या या भूमिकेचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला. लोकप्रियतेसोबतच तिला सोशल मीडियावरील गैरवर्तनाचाही सामना करावा लागला. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत अनंगशाने याबाबत मन मोकळे केले.
‘मिर्झापूर’मधील जरीनाची व्यक्तिरेखा पाहून काही लोकांनी तिच्याबद्दल चुकीचे समज करून घेतले. पडद्यावरील भूमिका आणि अभिनेत्रीचे खरे व्यक्तिमत्त्व वेगळे असते, हे अनेकांना समजले नाही. परिणामी, सोशल मीडियावर तिला आक्षेपार्ह मेसेज येत होते. इतकेच नाही तर काही लोकांकडून तिला आक्षेपार्ह मागण्यांचाही सामना करावा लागला.
तिच्या इन्स्टाग्रामच्या डीएममध्ये ‘एका रात्रीचे किती पैसे घेतेस?’ अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रकारामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा मानसिक तणाव निर्माण झाला होता. याचा खुलासा तिने या मुलाखतीत केला.
अनंगशा म्हणाली “काही लोक तिला ईमेल आणि सोशल मीडिया मेसेजद्वारे अश्लील मजकूर पाठवत असत. तिच्या डीएममध्ये आक्षेपार्ह मेसेज करत होते. ‘एका रात्रीचे किती पैसे घेतेस?’ अशा स्वरूपाचे प्रश्न विचारत होते. या प्रकारामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात मोठा मानसिक तणाव निर्माण झाला होता. अत्यंत कठीण परिस्थिती उद्धभवली होती.”
याच मुलाखतीत अनंगशाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचच्या अनुभवावरही भाष्य केले. एका वरिष्ठ कास्टिंग डायरेक्टरला तिची अभिनयक्षमता आवडली होती. त्याने अनंगशा चांगली अभिनेत्री असून तिच्यात मोठी क्षमता असल्याचेही सांगितले. मात्र, त्यानंतर त्याने दिलेला सल्ला अनंगशासाठी धक्कादायक होता.
अनंगशा म्हणाली “कास्टिंग डायरेक्टरने मध्यमवर्गीय कुटुंबातून आली असल्याने इंडस्ट्रीत पुढे जाण्यासाठी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची गर्लफ्रेंड बनण्याचा सल्ला दिला. मात्र, अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असा निर्णय मी सुरुवातीपासूनच घेतला होता.” ही धक्कादायक घटना तिने उघड केली. मात्र, तिने कोणाचेही नाव यावेळी घेतले नाही.
आज अनंगशा बिस्वासने आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘होस्टेज’ आणि ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केले आहे. बोल्ड आणि डार्क आशयाच्या भूमिकांसाठीही ती ओळखली जाते. आता ‘मिर्झापूर द मूव्ही’मध्ये ती पुन्हा झरिनाच्या भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.





