बिहार निवडणुकांत शिवसेना किती जागा लढवणार? संजय राऊत म्हणतात…
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना किती जागा लढवणार याबाबत वक्तव्य केलं आहे.

मुंबई – निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना किती जागा लढवणार याबाबत वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी, बिहार येथील शिव-सैनिकांनी ५० जागा लढवण्याची मागणी केली असल्याची माहिती दिली. मात्र ३० ते ४० जागा लढवाव्यात अशी आमची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना बिहार निवडणुकांमध्ये किती जागा लढवणार याबाबतचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये घेतला जाईल असं देखील राऊत यांनी यावेळी सांगितलं.
माध्यम प्रतिनिधींनी राऊत यांना, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार मैदानात उतरवणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘तुम्ही बघत रहा’ असे सूचक उत्तर दिले.
“मी बिहारला जाणार आहे. तेथे गेल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं देईन” असंही राऊत म्हणाले.





