पाकिस्तानच्या ताब्यात किती भारतीय नागरिक? दोन्ही देशांत कैद्यांच्या यादीची देवाण-घेवाण

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानने आज आपापल्या तुरुंगात असलेल्या परस्परांच्या कैद्यांच्या यादीची देवाण घेवाण केली. नवी दिल्ली आणि इस्लामाबादेत मुत्सद्यांच्या माध्यमातून एकाचवेळी या याद्यांची देवाण घेवाण करण्यात आली. कैद्यांबरोबर आपल्या ताब्यात असलेल्या मच्छिमारांच्या नावांचीही यादी परस्परांना देण्यात आली. दोन्ही देशांच्या वाणिज्य दूतावासामध्ये २००८ मध्ये झालेल्या करारांतर्गत अशी याद्यांची देवाण घेवाण दरवर्षी १ जानेवारीला आणि १ जून रोजी केली जात असते.
भारताने आपल्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या ३८१ कैद्यांची आणि ८१ मच्छिमारांची नावे पाकिस्तानला कळवली आहेत. त्याचप्रमाणे, पाकिस्तानने आपल्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक ४९ कैद्यांची आणि २१७ मच्छिमारांची नावे शेअर केली आहेत.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारताच्या नागरी कैद्यांना आणि मच्छिमारांना लवकरात लवकर मायदेशी परत पाठवले जावे, असा आग्रह भारताच्या बाजूकडून धरण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांच्या जप्त केलेल्या बोटीही परत मिळण्याची मागणी केली गेली आहे. शिक्षा पूर्ण झालेल्या १८३ भारतीय मच्छिमार आणि नागरी कैद्यांची सुटका आणि मायदेशी त्वरित पाठवण्यास पाकिस्तानला सांगितले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.





