Arvind Kejriwal : उत्तर प्रदेशात किती तास वीज मिळते? केजरीवालांची योगींना विचारणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी दिल्लीत आले आहेत. आज मी त्यांना विचारू इच्छितो की जनता म्हणत आहे की दिल्लीत २४ तास वीज असते.
उत्तर प्रदेशात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे, पण योगीजींनी उत्तर प्रदेशात किती तास वीज उपलब्ध आहे हे सांगावे. उत्तर प्रदेशात १०-१० तास वीजपुरवठा खंडित होतो अशी विचारणा करत केजरीवालांनी योगींना लक्ष्य केले. उत्तर प्रदेशात ४०० युनिटचे बिल ४००० रुपये आहे तर दिल्लीत ते शून्य रुपये आहे. योगींनी सांगावे की हे बील येते की नाही? पाणी बिलावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही निशाणा साधला.
ते म्हणाले, मला माहित नाही की त्यांनी (भाजपने) एलजीसोबत कोणते कट रचले. मी तुरुंगात गेल्यानंतर हजारो रुपयांचे पाण्याचे बिल येऊ लागले, पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सर्व बिले माफ करू. ते म्हणाले, जर आमचे सरकार आले तर आम्ही महिलांना २१०० रुपये देऊ. महिला हुशार असतात, पण पुरुष चुकीच्या मार्गाने जातात. ते भाजपकडे जाऊ शकतात, पण सर्व महिला त्यांना समजावून सांगतील.




