पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल; बैसरनमध्ये दहशतवादी कसे घुसले? प्रश्नांचा भडीमार

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होत असताना काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “पहलगामच्या बैसरनमध्ये पाच दहशतवादी कसे घुसले आणि त्यांनी २६ निरपराध नागरिकांची हत्या कशी केली?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. विरोधी पक्ष म्हणून देशहितासाठी सवाल उपस्थित करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवले.
लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या विशेष चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करत ६-७ मे रोजी रात्रीच्या ऐतिहासिक कारवाईचा उल्लेख केला. मात्र, गोगोई यांनी संरक्षणमंत्र्यांच्या भाषणावर पलटवार करताना म्हटले की, “मंत्र्यांनी अनेक माहिती सादर केली, पण पहलगामच्या बेसरनमध्ये दहशतवादी कसे घुसले, याबाबत काहीच सांगितले नाही. या हल्ल्याची आणि परराष्ट्र धोरणाची सत्यता सदनासमोर यायला हवी.”
“सत्य समोर येणे आवश्यक” –
गोगोई यांनी सरकारला उद्देशून सवाल केला की, “पाच दहशतवाद्यांनी बेसरनमध्ये घुसून २६ लोकांचा खून केला. हे कसे शक्य झाले? देशाच्या जनतेला हे जाणून घ्यायचे आहे की इतक्या मोठ्या संख्येने दहशतवादी भारतात कसे शिरले? सुरक्षाव्यवस्थेत नेमकी चूक कुठे झाली? हल्ल्याला १०० हून अधिक दिवस उलटले, तरी सरकारकडे याबाबत कोणतेही उत्तर नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, सरकारने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | Speaking in debate on Operation Sindoor, Congress MP Gaurav Gogoi says, “In the end, who takes the responsibility of the Pahalgam attack? The LG of Jammu and Kashmir. If someone needs to take the responsibility, it is the Union Home Minister. Union HM and the Central… pic.twitter.com/Wk9f3h4y0Y
— ANI (@ANI) July 28, 2025
“जम्मू-काश्मीर सुरक्षित आहे का?”
काँग्रेसचे प्रवक्ते गोगोई यांनी सरकारच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकारने अनुच्छेद १९ रद्द केल्याने जम्मू-काश्मीर सुरक्षित झाल्याचा दावा केला, पण बेसरनमधील लोक आजही भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. संरक्षणमंत्र्यांनी बेसरनमधील या दहशतीबाबत एकही शब्द उच्चारला नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारायला हवी. नायब राज्यपालांना पुढे करून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही,” असे गोगोई यांनी ठणकावले.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोगोई यांनी सरकारच्या धोरणांवर आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर सडेतोड टीका करत सत्य समोर आणण्याची मागणी केली.





