‘दीदी….आसामला धमकावण्याची हिम्मत कशी झाली?’ सीएम सरमा यांचा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Assam: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर त्यांनी पलटवार करत म्हटले की, तुमची आसामला धमकी देण्याची हिम्मत कशी झाली? आसामच्या इतर मंत्र्यांनीही बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
कोलकाता येथील एका जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येच्या घटनेच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. बंगाल जळल्यास आसाम, ईशान्य, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीसह इतर राज्येही जाळतील, असे त्या म्हणाले. तुमची खुर्ची डगमगेल असेही म्हणाल्या.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी X वर पोस्ट केली की दीदी, तुमची आसामला धमकी देण्याची हिम्मत कशी झाली. आम्हाला लाल डोळे दाखवू नका. तुमच्या अपयशाचे राजकारण करून भारत पेटवण्याचा प्रयत्न करू नका. फूट पाडणारी भाषा बोलणे तुम्हाला शोभत नाही.
त्याचवेळी आसामचे जलसंपदा मंत्री पियुष हजारिका म्हणाले की, त्या आम्हाला धमकावू शकत नाहीत. त्या त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करू शकत नाही आणि आम्हाला धमकावत आहेत. आसाममध्ये असे होणार नाही. ते म्हणाले की, मला ममता बॅनर्जींना विनंती करायची आहे की त्या खूप ज्येष्ठ नेत्या आहेत आणि दीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत, त्यांना सार्वजनिकपणे कसे बोलावे हे माहित असले पाहिजे. जोपर्यंत येथे भाजपचे सरकार आहे आणि हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आसाममध्ये असे काहीही होणार नाही.
आरजी कार घटनेविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. मध्यंतरी आंदोलकांनी राज्य सचिवालय ‘नबन्ना’ गाठण्याचा प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी पोलिसांशी झटापट झाली. कोलकाता आणि हावडा येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राज्यभरात 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.





