पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असून काही नगरपरिषदांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी रंगतदार लढती पाहायला मिळत असतानाच काही नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिनविरोध निवडणुका होणं हे चांगलं असलं तरी “भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, पण भाजपच्या जागाच बिनविरोध कशा होतात?” असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. त्यांनी हेही म्हटलं की, बिनविरोध निवडणूक प्रक्रिया लोकशाहीसाठी चांगली असली तरी एकाच पक्षाच्या जागा बिनविरोध होणं संशयास्पद आहे. रोहित पवारांच्या या विधानामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात चर्चा चांगलीच रंगली आहे. काय म्हणाले रोहित पवार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले, घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा #PARTY_WITH_DIFFERANCE आहे हे दाखवून दिल्याच टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे. असो, वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही रोहित पवार म्हणाले.