Daund : सर्वसामान्यांचे घरकुल आवाक्याबाहेरच
Daund : रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती तसेच पावसाची गंभीर परिस्थिती यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी घराची व्यावसायिक व इतर बांधकामे मंदावली असून काही बांधकाम व्यावसायिक, सेंट्रिंग ठेकेदार, शेतकऱ्यांनी बांधकामाची कामे तूर्तास बंद ठेवली आहेत. परिणामी बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मजुरांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे
सध्या सिमेंटचा दर हा ३५० रुपये तर स्टीलचे दर ५६ ते ६१ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. वाळू, खडी, डस्ट, विटा आणि इतर बांधकाम साहित्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बांधकामाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेकांनी नवीन बांधकामे सुरू करण्याचे निर्णय पुढे ढकलले आहे. त्यातच पावसाची गंभीर स्थिती असल्याने सुरू असलेली बांधकामेही अनेक ठिकाणी ठप्प झाली आहेत.
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी बांधकाम व सेंट्रिंगच्या कामांसाठी परराज्यातील मजूरही दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या रोजगाराच्या परिणाम होत आहे.
बोरीबेलचे ठेकेदार शुभम सूर्यवंशी म्हणाले, बांधकाम साहित्याचे दिवसेंदिवस वाढते दर आणि पावसामुळे कामे बंद राहिल्यास येणाऱ्या काळात बांधकाम मजुरांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. दररोज काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांना काम मिळाले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





