मुंबई – रिअल इस्टेट क्षेत्राची एकूण परिस्थिती पाहता पुढील दोन वर्षात घरांचे दर सर्वसाधारणपणे सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. महागड्या घरांचे आकर्षण पुढील पाच वर्षात कमी होऊ शकते. विकासदर वाढत असला तरी दरडोई उत्पन्न समान पद्धतीने वाढत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा घर घेणार्यांना घरे किफायतशीर वाटतील की नाही याबाबत शंका असल्याचे मत एका अभ्यासावालात व्यक्त करण्यात आले आहे. देशातील आघाडीच्या 15 विकासाशी चर्चा करून तयार केलेल्या अहवाला असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दहा वर्षात घरांचे दर दुपटीने वाढले आहेत. मात्र गेल्या काही तिमाहीपासून हे दरवाढ मंदावली आहे. दुसर्या तिमाहीचा विकासदर विक्रमी 8.2% इतका नोंदला गेला असला तरीही समृद्धी समान पद्धतीने वितरित झाली असल्याचे दिसून येत नाही. त्याचा इतर क्षेत्राबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रावर आहे परिणाम अपेक्षित आहे. रिअॅल्टी क्षेत्रातील तेजीचे नेतृत्व गेल्या पाच वर्षात महाग घरांनी केले असले तरी आगामी काळात ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता कमी आहे. महागडी घरे अनेक वेळा गुंतवणुकीसाठी घेतली जातात. आता घरांच्या किमती वाढणार आहेत. जमिनीच्या किमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी अशी घरे खरेदी करण्याचे प्रमाण कमी होऊन राहण्यासाठी घर खरेदी वाढणार असल्याची शक्यता आहे असे कॉलियर्स इंटरनॅशनल या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अजय शर्मा यांनी सांगितले. अहवालानुसार दिल्लीतील घराच्या किमती यावर्षी सात ते आठ टक्क्यांनी तर पुढील वर्षी सात टक्क्यांनी वाढतील. मुंबईतील घराच्या किमती पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बंगळूरू शहरातील घरांच्या किमती सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अनारॉक या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशातील सात मोठ्या शहरातील विकसकांनी तिसर्या तिमाहित नऊ टक्के कमी घरे विकली. मात्र त्यांचा नफा 14 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे सध्या तरी महागड्या घरांच्या विक्रीतून विकासाचा जास्त नफा होत आहे.