वाई -ज्यांनी दहा- वीस वर्षे आपल्याकडे चाकरी केली. आपल्यासोबत प्रामाणिक राहिले. व्यवसायवृद्धीसाठी दिवसरात्र योगदान दिले. बेईमानी नाही, असा हा असंघटित कामगार आज मरणयातना भोगतोय. खायला अन्न नाही, उपचाराला पैसे नाहीत. तो मदतीची याचना करतोय. हॉटेल मालक, बांधकाम व्यावसायिकांनो माणुसकी धर्म जपा. कामगारांच्या मदतीसाठी पुढे या, अशी भावनिक हाक रिपब्लिकन पक्षाने दिली आहे. हॉटेल व बांधकाम व्यवसायात मोठ्या संख्येने असंघटित कामगार पाहयला मिळतात. स्थानिक कामगारांसोबत परप्रांतीय लोकही येथे राबत आहेत. या व्यवसायांवर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दहा-वर्षे एकाच ठिकाणी काम करणारे अनेकजण आहेत. कुशलता, प्रामाणिकपणा, मालकाप्रती असलेली निष्ठा या त्रिसुत्रीमुळे या व्यावसायिकांचे उदयोग-व्यवसाय भरभराटीला आले, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या व्यवसायवृद्धीसाठी मोलाचा हातभार लावणाऱ्या हा असंघटित कामगार आज मरणयातना भोगतोय. लॉकडाऊन झाल्यावर व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद झाले. दोन महिने उलटले आज जैसे थे परिस्थिती आहे. महिना पगारावर काम करण्याऱ्या असंघटित कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. जवळ होते ते पैसे संपले. आता खायचं काय, उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, इतकी वर्षे ज्यांच्याकडे काम करतोय तोच आपल्याला आधार देऊ शकतो म्हणून असंख्य कामगार त्याच्याकडे मदतीची याचना करतायत. मात्र, या कामगारांची परिस्थिती पाहून कोणालाही दया येईना. धंदे बंद आहेत, कुठून तुला पैसे देणार, अशी असंवेदनशील उत्तरे देऊन इतक्या वर्षाच्या कामगारांच्या प्रामाणिकपणाचा, त्याच्या निष्ठेची प्रतारणा हे व्यावसायिक करत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी याबाबत नाराजी व्यक करून कामगारांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांनी आपल्या व्यवसायाला उभारी दिली, त्यांना संकटसमयी मदत करणे हे त्या मालकांचे कर्तव्य आहे असल्याचे गायकवाड यांनी म्हंटले आहे. जिल्हा प्रशासनाचे या गंभीर व अमानवीय प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी व जिल्ह्यातील कामगारांना दोन वेळचे अन्न आणि उपचारासाठी पैसे उपलब्ध करून देण्यासाठी मी व माझा पक्ष सरकारदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सरकारने लक्ष न दिल्यास असंघटित कामगारांना संघटित करुन शासनाविरुध्द तीव्र लढा पुकारण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.