सासवड : पुरंदर तालुक्यातील घरगुती गॅस पुरवठा सध्या सुरळीत सुरू असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील दिवे, जेजुरी, बोपगाव घाट परिसर, नीरा रोडवरील हॉटेल व्यावसायिकांवर टांगती तलवार लटकली आहे. दरम्यान, प्रशासनाने सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हे, माळशिरस, वीर, परिंचे या मोठ्या गावांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे होत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. इस्त्रालय आणि इराण युद्धाचा भडका भारतात जाणवू लागला आहे. सर्वांत पहिला फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. पुरंदर तालुका हा पर्यटन, ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहे. जेजुरी खंडोबा मंदिर असल्याने देशभरातून सरासरी २५ लाख भाविक हे दरवर्षी खंडोबाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. पुरंदर किल्ला असल्याने पर्यटकांचा रतीब घातला जात आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अष्टविनायक मंदिरास जाण्यासाठी पुरंदर तालुक्यातून भाविक मोठ्या प्रमाणात ये- जा करीत असतात. आखाती देशातील युद्धाचे लोण दिसू लागले आहे. पहिल्याच टप्प्यात सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होत आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. पुरंदर तालुक्यात हडपसरपासून ते नीरापर्यंत सरासरी १५० हॉटेल आहेत. तसेच बोपदेव घाटमार्गे जाताना हॉटेलची संख्या लक्षणीय आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावांत हॉटेल्सची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांना आता सिलिंडरची टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे अर्थकारण कोलमडून जात आहे. अलीकडच्या काळात काही भागात गॅस टंचाईबाबत चर्चा सुरू असली तरी पुरंदर तालुक्यात मात्र अशी कोणतीही परिस्थिती सध्या निर्माण झालेली नाही. स्थानिक गॅस वितरकांकडून नियमितपणे सिलिंडरचे वितरण केले जात असून मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी गॅस मिळण्यात अडथळा येत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील प्रमुख शहर असलेल्या सासवड येथेही गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे. आजही सासवड येथे गॅसची एक गाडी उपलब्ध झाली असून वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना गॅससाठी प्रतीक्षा करावी लागेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत पुरंदर तालुक्याचे पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे यांनी सांगितले की, तालुक्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्या कोणत्याही गावामध्ये गॅस टंचाईची समस्या जाणवत नाही. वितरकांमार्फत नियमितपणे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एकूणच पुरवठा व्यवस्थापन योग्य प्रकारे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या तरी तालुक्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे चित्र दिसत असून कोणतीही गंभीर अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मर्यादा संपल्याने ग्राहक अडचणीत सध्यातरी पुरंदर तालुक्यामध्ये गॅस पुरवठा हा सुरळीत आहे. परंतु दोन सिलिंडरच्या मध्ये 30 दिवसांच्या अंतर दिले आहे. त्यामुळे बारा सिलिंडरची संख्या संपल्यानंतर मात्र ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहेत, असे प्रवीण गॅस एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले. हेही वाचा : Right To Education : आरटीई प्रवेशाचा तिढा सुटला; जाचक अटींना हायकोर्टाची स्थगिती