नऱ्हेमध्ये हॉटेल व्यवसायिकाचा खून…

धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार
पुणे– नऱ्हे येथे एका हॉटेल व्यवसायीकाचा खून करण्यात आला. धारदार शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले. यामध्ये त्याच्या चेहऱ्याचा पुणे चेंदामेंदा झाला होता. ही घटना सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. यामुळे नऱ्हे परिसरात खळबळ माजली होती.
सुनिल बारकु लांगोरे(35,रा.नऱ्हे) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी सिंहगड पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे. तर दुसरीकडे आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणी सिंहगड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
यासंदर्भात सविस्तर असे की, सुनिल लांगोरे हे नऱ्हे परिसरात रहातात. त्यांच्या रहात्या इमारती शेजारीच त्यांचे छोटेचे स्नॅक सेंटर आहे. लॉक डाऊनमुळे त्यांचे कामगार गावाकडे गेले असल्याने ते मागील काही दिवस एकटेच हॉटेल उघडत होते. चहा आणी नाष्टा असा ठराविक मेन्यू ते पार्सल देत होते. आजही त्यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडले होते. हॉटेलमध्ये आलेल्या काही व्यक्तींशी त्यांची बाचाबाची झाल्यावर संबंधीत व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले.
यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात ते जागीच पडले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. आजूबाजूच्या नागरिकांची याची माहिती सिंहगड पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. घटनेचा पंचनामा करुन तपासासाठी पथके रवाना केली.





