जेवण न दिल्याने मद्यपींकडून हॉटेलची तोडफोड

जळोची (वार्ताहर) -जेवण न दिल्याच्या कारणावरून मद्यपींनी आचारी, वेटरला बेदम मारहाण करून हॉटेलचे 3 लाखांचे नुकसान केले आहे. ही घटना शिरवली (ता. बारामती) येथे रविवारी (दि. 14) घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल निकम, सागर निंबाळकर, अविनाश निंबाळकर, अभिजीत निर्मळ, अक्षय माने, लखन बरकडे, राज्यात राजेंद्र निंबाळकर, स्वप्निल निंबाळकर, माऊली बनकर, अक्षय जगताप, सोनू भोईटे, किशोर पांढरे, रणजीत निंबाळकर, संग्राम मोहिते, रोहित मोहिते (सातही जणांचे पूर्ण नाव माहित नाही तर सर्व.रा. राजाळे, जि. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्यांचे नाव आहे. राहुल थोरात यांनी फिर्याद दिली आहे.
शिरवली हद्दीत विजय रेस्टॉरंटमध्ये पाच ते सहा मद्यपींनी आले व त्यांनी हॉटेल मालकास तावरे यांना जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी जेवणासाठी बंदी असून, फक्त पार्सल सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मद्यपींनी येथेच जेवायला देण्याचा तगादा लावत बाचाबाची करत तावरे यांच्याशी झटापट केली. यावेळी लोकांनी समजूत काढत वाद मिटवला. त्यानंतर मालक तावरे हे आपल्या घरी गेले.
मद्यपींनी आणखी काही तरुणांना कार व मोटरसायकलवरून येत हॉटेलची तोडफोड सुरुवात केली. यावेळी आचारी व वेटरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मद्यपींनी त्यांना मारहाण करीत काउंटरमधील 10 हजारांची रक्कम लंपास केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहे.





