प्रभात वृत्तसेवा जांबूत – जांबूत- शरदवाडी (ता. शिरूर) येथे समाजकंटकांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करीत सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असून अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबूत, शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपले शेतात दीड वर्षांपूर्वी भगवा जातीच्या तेराशे डाळिंब रोपांची सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. लाखो रुपयांचे भांडवल लावून डाळिंब पिकाचा बहर त्यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागून पुढील तीन महिन्यांत डाळिंब फळे काढण्यायोग्य होणार होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटाकाकडून सर्वच १३०० झाडे तोडून टाकण्यात आली. यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून योग्य तपास करून या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे. मागील दीड वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाचा सध्याच्या हंगामात त्यांनी बहर धरलेला असून फळधारणा झालेली फळे पुढील तीन महिन्यात डाळिंब फळे काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाची अशाप्रकारे समाजकंटकांकडून झालेल्या नुकसानीमुळे लागवडपासून आजपर्यंत खर्ची घातलेले भांडवल आणि धरलेल्या बहर या सगळ्याचा विचार करता अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सध्याच्या काळात कांदा पिकासह सर्व शेतमालांचे भाव पडलेले असून शेतकरी मेटकुटीला आला आहे. लाखो रुपयांचे लावलेला भांडवली खर्च निघने देखील शक्य नसून त्यात अशा प्रकारे लाखो रुपयांचे भांडवल लावून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नसल्याने चुकीच्या पद्धतीने नुकसान पोहचविणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राजकारण, पूर्ववैमनस्यातून प्रकार शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या डाळिंबाच्या बागा एकाच रात्रीतच भुईसपाट झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागात गावकी, भावकीचा वाद, शेतीच्या बांधाचा वाद, राजकीय कुरघोडी, पूर्ववैमनस्यातून झालेल्या घटना आदी कारणे याला कारणीभूत असल्याची शक्यता आहे. त्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत. किमान दहा ते पंधरा जणांचा समावेश जांबूत- शरदवाडीत डाळींब बागांवर कुऱ्हाड चालविल्याने शेतकऱ्यांतून हळहळ अन् संतापाची सूर उमटला आहे. तीन एकर डाळिंब बाग तोडण्यासाठी किमान दहा ते पंधरा जण समाजकंटक असावेत, असा अंदाज आहे. एकाच रात्रीतच तीन एकर बागा तोडण्यासाठी हे विघ्नसंतोषी समाजकंटक आले असावेत, अशी शक्यता आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी याचा कसून तपास करण्याची मागणी होत आहे.