उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशी अडचणीत

नागपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी सदर तक्रारीची दखल न घेता कार्यवाही न केल्यामुळे जबलपुरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निविदा काढण्यासाठी मंदिराच्या नावाने खोटे दाखले वापरल्याचा आरोप आहे.
आंभोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ११५ कोटींच्या निविदेत पात्र ठरण्यासाठी १२१ कोटींची निविदा शक्ती बिल्डकाॅनला देण्यासाठी खटाटोप करण्यात आला. संदीप जोशी यांनी आपल्या जवळच्या लोकांना लाभ व्हावा यासाठी ते अध्यक्ष असलेल्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे खोटे अनुभव प्रमाणपत्र तयार केले. ते सार्वजनिक बांधकाम विभागात सादर केले आणि ११५ कोटींचे टेंडर १२१ कोटींमध्ये मिळवून दिले. या भ्रष्टाचारात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
या गंभीर प्रकरणाची तक्रार ३ जुलै २०२४ रोजी सदर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तांकडे केली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने याचिकाकर्त्याने तक्रार दाखल करून घेण्यात यावी यासाठी जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. तन्वी चौधरी काम पाहात आहेत.
जबलपुरेंच्या आरोपात तथ्य नाही –
मोहनीश जबलपुरे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोणत्याही संस्थेत काम केलेल्या व्यक्तीला अनुभव प्रमाणपत्र देण्यात येते. तसे मीही दिले आहे. त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. माझ्या सार्वजनिक जीवनात कोणताही गैर प्रकार कधी केलेला नाही, असा दावा या प्रकरणी सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केला आहे.





