होमगार्ड जवानाला जमावाकडून मारहाण
सदरबझारमधील घटनातीन महिलांसह15 जण ताब्यात

सातारा -मास्क का लावला नाही, अशी विचारणा करणाऱ्या होमगार्ड जवानाला जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना सदरबझार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात गुरूवारी दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली. विश्वनाथ मामणे असे जखमी जवानाचे नाव असून त्यांच्या तोंडाला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन महिलांसह 15 जणांना ताब्यात घेतले आहे. या परिसरात बंदोबस्त कडक करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की लॉकडाऊन व अत्यावश्यक सेवांवर देखरेख करण्यासाठी सातारा शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदरबझार कॅनॉलनजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण वसाहत परिसरात होमगार्ड जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होमगार्ड जवान विश्वनाथ मामणे येथे सेवेवर हजर होते.
दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान एक युवक तेथून चालत जात असताना मामणे यांनी त्याला मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. हा युवक पुन्हा जमाव घेऊन तेथे आला. त्यांनी मामणे यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत त्यांच्या तोंडाला दुखापत झाली. जमावाच्या या कृत्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची खबर मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये 15 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे समीर शेख यांनी “प्रभात’ला सांगितले. जखमी जवान मामणे यांचीही शेख यांनी आवर्जून चौकशी केली.





