नवी दिल्ली : एप्रिल ते जून या कालावधीत म्हणजे पहिल्या तिमाहीत देशातील सात मोठ्या शहरांमध्ये घरांच्या दरात 11 टकची वाढ झाली आहे. या कारणामुळे त्या कालावधीत या सात शहरात घर विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे अॅनॉरॉक या संस्थेचे म्हणणे आहे.अॅनॉरॉकने देशातील सात मोठ्या शहरातील घर विक्रीची आकडेवारी संकलित करून हा अहवाल तयार केला असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत देशातील बँकांनी घराच्या कर्जावरील व्याजदरात बरीच कपात केली होती. मात्र तरीही मागणी जास्त असल्यामुळे घरांच्या दरात वाढ झाली असल्याचे समजले जाते. यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत सात शहरात 96,285 घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी या कालावधीत 1,20,335 घरांची विक्री झाली होती. चेन्नई शहर वगळता इतर सर्व शहरात म्हणजे दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, मुंबई महानगर प्रदेश, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, कोलकत्ता या शहरातील घरांची मागणी कमी झाली आहे. गेलल्या आठवड्यात प्रॉप इक्वीटी या संस्थेने या तिमाहीत घरांची विक्री 19 टक्क्यांनी कमी झाल्याची आकडेवारी जाहीर केली होती. कमी झालेल्या घर विक्रीबाबत बाबत अॅनॉरॉक कंपनीचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, देशात आणि परदेशामध्ये या कालावधीत युद्धजन्य परिस्थिती होती. त्यामुळे घर खरेदी करणारे कुंपणावर बसून होते. या कालावधीत भारत – पाकिस्तान दरम्यान संघर्ष चालू झाला. तर याच कालावधीमध्ये इतर काही देशातही संघर्ष चालू आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केले आहे. अशा परिस्थितीत मोठीे गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार पुढाकार घेत नसल्याचे यातून स्पष्ट होते. मात्र आता व्याजदरात कपात झाली आहे आणि परिस्थिती निवळत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळामध्ये घरांची मागणी आणि पुरवठा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई शहरातील घर विक्री 25 टक्क्यांनी, बंगळूर शहरातील घर विक्री 8 टक्क्यांनी, हैदराबाद शहरातील घर विक्री 27 टक्क्यांनी, कोलकत्ता शहरातील घर विक्री 23 टक्क्यांनी कमी झाली आहे. पुणे शहरातील घर विक्री 27 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. तर चेन्नई शहरातील घर विक्री 11 टक्क्यांनी वाढले आहे.