पुणे -परराज्यासह इतर जिल्ह्यात अडकलेल्यांना मूळगावी जाता येणार असल्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर पुणे, मुंबईसह अन्य शहरांतून अनेक नागरिक पुणे जिल्ह्यात आले. मात्र, बाहेरून आलेल्यांची कोणतीही स्वॅब तपासणी न करता त्यांना होम किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आलेल्या 55 हजार 545 नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. तर, 644 संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये 3 हजार 990 नागरिकांना क्वारंटाइन केल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 11 हजार 725 नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. तर संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये खेड तालुक्यात सर्वांत जास्त 1 हजार 312 जणांना क्वारंटाइन केले आहे. गावपातळीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून संस्थात्मक क्वारंटाइन सेंटर तयार केले आहेत. ग्रामपंचायतींकडून त्यावर देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडून क्वारंटाइनबाबत सूचना केल्या आहेत. त्यामध्ये होम क्वारंटाइनबाबतचा शिक्का मारण्यात यावा, संबंधित नागरिक सर्व नियम पाळत आहे, याची आरोग्य पथकाला खात्री करण्याची जबाबदारी सोपवली आहे. संबंधित नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यास किंवा त्या व्यक्तीच्या घरात पुरेशा खोल्या उपलब्ध नसल्यास त्यांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्च महिन्यात दिले आहेत.