गृहमंत्र्यांनी “त्या’ पत्राबाबत खुलासा करावा ! भाजपा प्रवक्‍त्यांची मागणी

मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगींच्या मरकज कार्यक्रमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक पत्र बुधवारी सोशल मिडियावर जारी झाले होते. त्या पत्राबद्दल भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी साशंकता व्यक्त केली आहे. या पत्रामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

ते पत्र खोटे असेल तर तो मोठा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे “त्या’ पत्राबाबत गृहमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर बुधवारी सोशल मिडियावर एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यांनी त्यात दिल्लीतील निजामुददीन मरकजबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या मरकजला परवानगी दिली कोणी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मध्यरात्री दोन वाजता मरकजमध्ये कोणी जायला सांगितले आदी प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्रिय गृहमंत्रालयाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या निवेदनाबाबत माधव भांडारी यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

प्रथम दर्शनी ते पत्र-प्रेस रिलीज-निवेदन हे खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक भाषा नसून अतिशय अनौपचारिक भाषेत ते लिहिले गेले आहे. ते कोणा प्रति लिहीले आहे किंवा प्रेस रिलीज असल्यास “प्रसिद्धीसाठी’ असेही त्यात लिहिण्यात आलेले नसल्याने ते यापैकी नेमके काय आहे हे कळत नाही आणि त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे. जर सदर पत्र-प्रेस रिलीज-निवेदन खोटे असेल तर हा एक गंभीर गुन्हा आहे आणि सदर गुन्हा जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल तर ती अधिकच गंभीर बाब आहे, असे भांडारी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या विषयात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच सदर पत्र-प्रेस रिलीज-निवेदन खोटे असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माधव भांडारी यांन केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.