नगर – संपूर्ण जगच करोना विषाणूशी लढा देत आहे. त्यात पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर मशीनचा जगात सगळीकडेच तुटवडा आहे. अशावेळी त्याची गरज लक्षात घेऊन नगरच्या विशाल व प्रशांत सिसोदिया यांनी इंटरनेटचा आधार घेऊन लॉकडाऊन काळात घरबसल्या व्हेंटिलेटर मशीन तयार केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांच्यासमोर या मशीनचा डेमो दोन्ही बंधुंनी दिला असून, त्याची उपयुक्तता तपासली जात आहे. मात्र, प्राथमिक पाहणीत याचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रतिक्रीया वैद्यकीय सूत्रांनी दिल्याने सिसोदिया बंधुंच्या उपक्रमाचे आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक केले आहे. प्रशांत व विशाल सिसोदिया या दोन्ही भावांनी इंटरनेटचा उपयोग करुन घरबसल्या हे मशीन तयार केले. या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन समाजाच्या उपयोगी पडण्याचे काम या दोन्ही बंधूंनी करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. डॉ. मुरंबीकर म्हणाले, “”सिसोदिया बंधुंनी घरात बसण्याचा वेळ एका चांगल्या कामासाठी वापरला. या मशीनचा नक्कीच चांगला उपयोग होईल. अनेक केसेसमध्ये करोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन घेण्याची गरज पडते. सिसोदिया यांनी तयार केलेल्या या मशीनमधून ती भागविता येऊ शकेल.” विशाल सिसोदिया यांनी मशीन बनविण्याचा फॉर्म्युला व त्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची माहिती दिली. तसेच केवळ सामाजिक भावनेतून हे मशीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपूर्त केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयासाठी मोफत…! जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्याचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना त्या मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या मशीनचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रीय वैद्यकीय सूत्रांनी दिल्यानंतर सिसोदिया परिवाराने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हे मशीन जिल्हा रुग्णालयाच्या सेवेसाठी मोफत दिले. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.