दरवर्षी औद्योगिक परिसरात होतात चोऱ्या पिंपरी – काही उद्योगांना गुरुवारपासून सुट्ट्या लागल्या तर आहेत काही उद्योगांना शुक्रवारपासून दिवाळीनमित्त सुट्टी आहे. 24 तास यंत्राच्या गडगडाट असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात दिवाळीच्या काळात शांतता असते. उद्योग सुरु असतानाही औद्योगिक क्षेत्रात चोऱ्या होतात, दिवाळीच्या सुट्टीच्या काळात तर चोरट्यांचा सुळसुळाट असतो. सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक असतानादेखील चोऱ्या होत असल्याने विशेषत: लघुउद्योजकांचा जीव टांगणीला लागला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये सात हजार लहान-मोठे उद्योग आहेत. यापैकी बहुराष्ट्रीय उद्योगांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. तर बहुतांशी मध्यम व लघुद्योग आहेत. यापैकी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सीसीटीव्ही व खासगी सुरक्षा रक्षकांची मोठी फौज तैनात केलेली असते. त्यामुळे या उद्योगांना चोऱ्या-माऱ्यांचा त्रास भेडसावत नाहीत. मात्र, लघुउद्योगांमध्ये सुरक्षा रक्षक नेमणे परवडणारे नसल्याने, दिवाळीच्या काळात बंद उद्योगांमधील तांब्याच्या तारा व इतर किमती वस्तु चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते. मात्र, आता दोन तीन लघुउद्योग मिळून खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यावर भर दिला जात आहे. तर अनेक उद्योजकांनी कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात औद्योगिक वसाहत जवळपास निर्मनुष्य असल्याने खासगी सुरक्षा रक्षकांना मारहाण करुन जबरी चोऱ्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद होऊन ते फुटेज पोलिसांना देऊनही या गुन्ह्यांच्या तपासामध्ये फारशी प्रगती झाली नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. पाच सहा वर्षांपुर्वी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने पोलीस वाहनांच्या इंधनाचा खर्च व काही प्रमाणात मनुष्यबळाचा भार उचलून दिवाळीबरोबरच अन्य काळातही रात्र गस्त उपक्रम राबविला होता. मात्र, पैशांअबावी हा उपक्रम बंद करण्यात आला. तर दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी दिवाळीच्या काळात केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे रेकॉर्डवरील अनेक सराईत गुन्हेगार सापडल्याने चोऱ्यांना आळा बसला होता. अद्याप निर्णय नाही सध्या करोनाच्या काळात सहा महिन्यांच्या मंदीनंतर आता कुठे उद्योगांच्या चाकांना गती मिळाली आहे. तर दिवाळीमुळे कमीतकमी तीन तर जास्तीतजास्त सात दिवस उद्योग बंद राहणार आहेत. या काळात उद्योगांमधील चोऱ्यांची उद्योजकांना धास्ती बसली आहे. काही दिवसांपुर्वी लघुउद्योग संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेत, दिवाळीच्या काळात औद्योगिक वसाहतीमध्ये पोलीस गस्त सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. करोनामुळे लघु व मध्यम उद्योगांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तर आता दिवाळीच्या काळात मध्यम व लघुउद्योग काही दिवस बंद राहिल्याने त्यामध्ये चोऱ्या झाल्यास, त्याचा उद्योजकांना आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत गस्त सुरु करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे. – संदीप बेलसरे अध्यक्ष, पिंपरी–चिंचवड लघुउद्योग संघटना