पिंपरी | कागदावरच भरले जात आहेत खड्डे

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरात पावसाची दररोज हजेरी सुरु आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती काही उपनगरांची झाली आहे.
दुसरीकडे पालिका मात्र खड्डे भरल्याचा दावा करत आहेत. आजअखेर २ हजार ३९५ खड्डे बुजविल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केला आहे. तरी, काही भागात नव्याने खड्डे निर्माण होत असल्याने नागरिकांमधून महापालिका प्रशासनावर टीका केली जात आहे.
मागील काही दिवसांत जोरदार पाऊस पडला. तब्बल पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली नाही. या पावसाने शहातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. वाहनचालकांना अक्षरश: खड्ड्यातून मार्ग काढणे जिकरीचे झाले.
खड्ड्यांमुळे काही भागात वाहनचालकांचे अपघात होऊन नारिकांना दुखापत झाली. तेव्हा निकृष्ट दर्जाचे रस्ते केल्याची टीका महापालिका प्रशासनावर करण्यात झाली.
त्यावर पालिका प्रशासन स्तरावर खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेष पथकांची रचना करण्यात आली. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयनिहाय खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिका स्थापत्य विभागाकडून हाती घेण्यात आली.
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात आजपर्यंत २ हजार ९५१ खड्डे पडल्याची नोंद करण्यात आली. मागील आठवड्यात ७३८ खड्डे आढळून आले आहेत. यातील ९६२ खड्डे डांबराने व कोल्ड मिक्सचा वापर करुन भरुन काढण्यात आले. २६९ खड्डे बीबीएम भरुन दुरुस्त केले.
९४६ खड्डे जीएसबी व पेव्हिंग ब्लॉक लावून भरुन काढले, तर २२१ खड्डे काँक्रीट भरुन दुरुस्त केले. आजअखेर एकूण २ हजार ३९५ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे.
त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम ८१ टक्के पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, उर्वरीत ५५६ खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
खड्डे बुजविण्याची कार्यवाही केली जात आहे. काही अंशी काम राहिले असले तरी प्रथम मोठे खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले आहे.
काही ठिकाणी नवीन खड्डे निर्माण झाल्यास त्याची नोंद घेऊन ते बुजविण्याची कार्यवाही केली जात आहे. तसे आदेश संबंधित अभियंत्यांना दिले गेले आहेत.- ज्ञानदेव जुंधारे, सह शहर अभियंता, स्थापत्य





