हॉकी संघाचा हॉलंड दौरा रद्द
Updated On:

नवी दिल्ली – भारताच्या पुरुष हॉकी संघाचा आगामी हॉलंड दौरा रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या धोक्यामुळे हॉलंड हॉकी संघटनेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात नकार दिल्यामुळे भारतीय हॉकी महासंघाने हा दौरा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यामुळे आता बेंगळुरूमध्ये सुरू असलेले पुरुष व महिलांच्या हॉकी सराव शिबिराचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
आता पुरुष संघाचे शिबिर येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत तर महिला संघाचे शिबिर 12 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, असेही महासंघाने जाहीर केले आहे. करोनामुळे मार्च महिन्यापासून सुरू होणारे हे शिबिर लांबणीवर टाकले गेले होते.
आता हा धोका काहीसा कमी झाल्याचे दिसल्यावर बेंगळुरूमध्येच या शिबिराचे आयोजन केले गेले. ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंची या शिबिरादरम्यान सातत्याने करोनाची चाचणीही केली जात आहे.





