पिंपरी, (प्रतिनिधी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला एका कारने धडक दिली. त्यानंतर कारचालक पळून गेला होता. याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी हरीश जालिंदर वाघमारे (रा. रहाटणी) या कारचालकाला अटक केली आहे. विजया नायर (वय 55, रा. पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे.याबाबत त्यांच्या मुलीने रविवारी (दि. २१) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजया नायर शिक्षिका असून वाघेरे कॉलनी मधील शिवाजी पुतळा परिसरात पायी जात होत्या. त्यावेळी पिवळी नंबर प्लेट असलेल्या कारने नायर यांना धडक दिली. या अपघातात त्या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्यांच्या अंगावर दुचाकी पडली तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायर यांना धडक दिल्यानंतर कारने एक रिक्षा आणि एका दुचाकीला देखील धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग म्हणाले, “घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालकाला पकडण्यासाठी तात्काळ पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाला ताब्यात घेतले आहे.”