ठाणे – ठाणे शहरात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. घोडबंदर रोडवरील विजय गार्डन हाऊसिंग सोसायटीजवळील स्कायवॉक पुलाखालून रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कासारवडवली पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुरूष आणि ती महिला पार्टीवरून परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. महिला मागे बसलेली होती. ती अपघातग्रस्त वाहनाच्या चाकाखाली आली, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पोलीस अपघातग्रस्त वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत.