पुण्यात पुन्हा हिट अॅड रन! भरधाव वाहनाने लष्करी अधिकाऱ्याला चिरडले; उंड्रीतील घटना, चालक पसार

Pune Accident News | पुण्यात पुन्हा एकदा हिट अॅड रनची घटना घडली आहे. उंड्री परिसरात मॅार्निंग वॅाकला गेलेल्या जेष्ठ व्यक्तीला भधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली. या अपघातात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उंड्री भागात घडली.
या अपघातात सुजितकुमार बसंतप्रसाद सिंग (वय ४९, रा. हांडेवाडी रोड, उंड्री) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अर्जना सुजितकुमार सिंग यांनी काळेपडळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक सिंग हे रक्क्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांच्या मदतीला न धावता तेथून पसार झाला.
काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते हांडेवाडी रस्त्यावरील विद्यानिकेतन सोसायटीत राहतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास न्याती इबोनी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीसमोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी ही माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काळेपडळ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अशी माहिती त्यांनी दिली.
सिंग यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांना डॅाक्टरांनी मृत घोषित केले. सिंग हे मार्निंग वॅाकसाठी घराबाहेर पडले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पडताळणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या एक्सवरुन ट्वीट करत पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी महापालिकेला केली आहे.
उंड्री परिसरात एका वाहनाने ठोकरल्याने ‘मॉर्निंग वॉक’ करत असलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही अतिशय दुःखद व दुर्दैवी घटना आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकास भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेमुळे या भागातील नागरीकांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला…
— Supriya Sule (@supriya_sule) April 1, 2025





