कार्ला येथील एकवीरा देवी पालखी सोहळा धार्मिक पद्धतीने
कार्ला – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील कुलस्वामिनी श्री आई एकवीरा देवीची मंगळवारी (दि. 31) चैत्र सप्तमीला होणारी यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली होती; परंतु धार्मिक परंपरेनुसार पहाटे आरती, अभिषेक तर सायंकाळी सात वाजता धार्मिक परंपरेनुसार पालखी काढून मंदिर परिसरात फिरविण्यात आली.
या वेळी देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश संजय मुळीक यांच्या हस्ते आरती करून देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरात पालखी फिरवण्यात आली. महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री समाजाची कुलस्वामिनी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीची यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असते. तसेच षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा पालखी मिरवणूक सोहळा तसेच सप्तमीला कार्ला गडावर सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा झाला. देवीचे हे तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्याला किमान पाच ते सहा लाख भाविक दरवर्षी एकवीरा देवी दर्शनासाठी येत असतात.
यावर्षी मात्र करोना या संसर्गजन्य आजारामुळे भाविकांच्या आरोग्याचा विचार करता गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वेळी कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, वेहरगाव पोलीस पाटील अनिल पडवळ देवीचे पुजारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला.