पुणे -मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात पहिल्यांदाच एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुणे विभागाला मागील आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीतून 615 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात सरासरी 64 टक्के वाढ झाली असून, एक हजार 10 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत पुणे विभागातून सरासरी पाच कोटी प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती वाणिज्य प्रमुख मिलिंद हिरवे यांनी दिली.
पुणे विभागात 70 रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक हे सर्वात मोठे स्थानक असून, उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुण्याचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. प्रवाशांबरोबरच रेल्वेचे उत्पन्न देखील वाढले असून, पुणे रेल्वे विभागाला चालू आर्थिक वर्षात 26 मार्च पर्यंत एकूण एक हजार 524 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
गतवर्षांच्या तुलनेत उत्पन्नात 362 कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. पुणे विभागाचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत प्रवासी वाहतूक असून, या वर्षी प्रवासी वाहतुकीतून एक हजार 10 कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 64 टक्के वाढ झाली आहे. पुणे विभागाच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नाने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक, पार्सल आणि इतर माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर ठेवलेला विश्वास आणि पुणे विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे योगदान यामुळे एक हजार कोटींचा टप्पा ओलांडने शक्य झाले आहे.
– इंदूराणी दुबे, डीआरएम, पुणे विभाग