शिवाजी ट्रेल, भोरगड समितीकडून पुरातन वारशाची जपणूक
राजगुरूनगर -दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगड संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्गपुजा सोहळा भोरगिरी (ता. खेड) येथील भोरगड किल्ल्यावर शिवाजी ट्रेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर व विश्वस्त विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगड संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर व सुवर्णा सचिन तोडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे 23वे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतातील इतर नऊ राज्यातील 121हून अधिक गड-किल्ल्यांवर एकाचवेळी विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्गपूजा करण्यात आली. भोरगड किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात ही ऐतिहासिक दुर्गपूजा झाली. यावेळी ओडीसा येथील शिवभक्त रंजन मिश्रा, सुमेध थोरात, सुमित शेळके, तन्मय कोकणे, वजीर शेख, गणेश गडदे, रोहित अस्वले यांसह शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते.
शिवाजी ट्रेल संस्थेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी सर्वत्र दुर्गपूजा करून दुर्गसंवर्धन कामास सुरूवात केली जाते, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली. शिवाजी ट्रेलची ही दुर्गपूजा 2016 मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ व तामिळनाडूमधील 121 गड-किल्ल्यांवर होण्यास सुरुवात झाली. त्यात विविध सरदार व संस्थानिक घराण्यातील वंशज सहभागी होत आहेत. त्यानंतर दरवर्षी 121 किल्ल्यांवर दुर्गपूजा संपन्न होते. अशी माहिती शिवाजी ट्रेलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर यांनी दिली.