Sanjay Kapoor : पहिलाच सिनेमा फ्लॉप, ‘राजा’ने बनवलं स्टार! तब्बूला डेट करत होता अभिनेता; संजय कपूरबद्दलच्या या गोष्टी माहितीयेत?
Sanjay Kapoor : अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत झळकलेल्या ‘राजा’ या चित्रपटाने संजय कपूरला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आणि संजय कपूर रातोरात स्टार झाला.

Sanjay Kapoor : बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. या कुटुंबातील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
याच कुटुंबातील अभिनेता संजय कपूर यानेही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्याच्या वाट्याला अपयश आले, मात्र त्यानंतर त्याने यशाची चवही चाखली. विशेष म्हणजे, अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत झळकलेल्या ‘राजा’ या चित्रपटाने संजय कपूरला ( Sanjay Kapoor) मोठी लोकप्रियता मिळवून दिली आणि संजय कपूर रातोरात स्टार झाला. (Sanjay Kapoor)
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील संजय कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. या यशामुळे संजय कपूरच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. मात्र, त्यानंतर त्याच्या प्रत्येक चित्रपटाला असेच यश मिळाले नाही.
याच वर्षी संजय कपूरने अभिनेत्री तब्बूसोबत ‘प्रेम’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने संजय कपूर आणि तब्बू यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते.
संजय कपूरने स्वतः दिली होती प्रेमाची कबुली (Sanjay Kapoor)
संजय कपूर आणि तब्बू यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा झाली. संजय कपूरने एका जुन्या मुलाखतीत तब्बूसोबतच्या प्रेमसंबंधांबाबत खुलासा केला होता. ‘प्रेम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते, अशी कबुली त्याने दिली होती. मात्र, चित्रपटाचे चित्रीकरण संपेपर्यंत त्यांच्यातील संवादही बंद झाला होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे नाते संपुष्टात आल्याचे संजय कपूरने सांगितले होते.
पुढे संजय कपूरने १९९७ मध्ये महीप कपूरसोबत लग्न केले. या जोडप्याला शनाया कपूर आणि जहान कपूर अशी दोन मुले आहेत. शनाया कपूरनेही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून, २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले.
वयाच्या ६१व्या वर्षात संजय कपूरची वाटचाल ( Sanjay Kapoor)
संजय कपूर यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९६५ रोजी मुंबईत झाला. आज १७ ऑक्टोबर रोजी ते आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘औजार’, ‘मोहब्बत’ आणि ‘सिर्फ तुम’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.
चित्रपटांबरोबरच ओटीटी विश्वातही संजय कपूर यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘द फेम गेम’ आणि ‘संकल्प’ यांसारख्या वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, तरी संजय कपूर यांनी मनोरंजनविश्वातील आपली ओळख कायम ठेवली आहे.





